Home Cities जळगाव इराण-इस्रायल युद्धाचा बाजारपेठेवर परिणाम ; खाद्यतेल ३०% महाग, तांदळाच्या दरातही वाढ

इराण-इस्रायल युद्धाचा बाजारपेठेवर परिणाम ; खाद्यतेल ३०% महाग, तांदळाच्या दरातही वाढ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही जाणवू लागला आहे. जळगावच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी दिसून आली असून, तांदळाच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी व्यापारी संघटनांनी नागरिकांनी घाबरून जाता गरजेपुरतीच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किमतींमध्ये तब्बल २५ ते ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या दरात अचानक वाढ झाल्याने किराणा बाजारपेठेत त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. यामुळे किराणा दुकानदार आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही नव्या दरानुसार व्यवहार करावे लागत आहेत.

दुसरीकडे, आखाती देशांकडे तांदळाची निर्यात वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही व्यापाऱ्यांच्या मते, निर्यातीसाठी पाठवलेले काही कंटेनर युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडल्याची माहिती आहे. हा माल परत बाजारात आल्यास आगामी काही दिवसांत तांदळाच्या दरात काहीशी घट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

दाना बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक धूत आणि एकता रिटेल किराणा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीचंद अडवाणी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाजारपेठेत सध्या अन्नधान्य आणि किराणा वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नाही. नागरिकांनी केवळ आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी कराव्यात, अन्यथा अनावश्यक तुटवडा निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, खाद्यतेल आणि तांदळाच्या वाढलेल्या दरांचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावरही होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष लेखराज उपाध्याय यांनी याबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आगामी काळात परिस्थिती अशीच राहिल्यास हॉटेल उद्योगासमोर आर्थिक आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound