
मुंबई-वृत्तसेवा | इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाबाबत मोठी माहिती समोर आली असून IPL 2026 ची सुरुवात आता 28 मार्चपासून होणार आहे. रविवारी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यापूर्वी स्पर्धेची सुरुवात 26 मार्चपासून होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने सुरक्षा आणि प्रशासकीय कारणांमुळे बीसीसीआयला स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करावा लागला आहे.
निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये आयपीएलसाठी वापरली जाणारी काही प्रमुख स्टेडियम आहेत.
तमिळनाडूतील एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) हे चेन्नई सुपर किंग्सचे होम ग्राउंड आहे.
पश्चिम बंगालमधील ईडन गार्डन्स हे कोलकाता नाइट रायडर्सचे घरचे मैदान आहे.
तर आसाममधील बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम वेन्यू म्हणून वापरले जाते.
या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम असल्यामुळे आयपीएलच्या सामन्यांचे नियोजन करताना बदल करावा लागण्याची शक्यता आहे.
2008 पासून आयपीएल सुरू झाल्यानंतर जेव्हा-जेव्हा देशात सार्वत्रिक किंवा विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करण्यात आले आहे.
2009, 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांच्या काळातही अशीच पद्धत अवलंबण्यात आली होती. त्यामुळे यंदाही बीसीसीआय सुरुवातीला पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करेल आणि नंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएलचा उद्घाटन सामना कुठे होणार याबाबतही चर्चा सुरू आहे. कारण गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा उद्घाटन सामन्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या होम ग्राउंडबाबत अद्याप स्पष्टता नाही.
गेल्या वर्षी जून महिन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे आरसीबीच्या विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट संघटना यांच्यात सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू आहे.
आरसीबीने आपल्या होम सामन्यांसाठी पर्यायी ठिकाणांचा विचारही सुरू केला आहे. त्यासाठी नवी मुंबई, रायपूर आणि पुणे या शहरांना पर्यायी वेन्यू म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान फ्रँचायझींना हा हंगाम 26 मार्च ते 31 मे दरम्यान होणार असल्याची माहिती दिली होती. आता उद्घाटनाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलली असली तरी 31 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या तारखेत बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे आयपीएल 2026 च्या थराराची सुरुवात थोडी उशिरा होणार असली तरी क्रिकेटप्रेमींसाठी मार्चच्या अखेरीपासून पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटचा जल्लोष रंगणार आहे.



