भुसावळ व यावल नगरपरिषदेत भ्रष्टाचाराची चौकशी करा-वंचित बहुजन आघाडी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ आणि यावल नगरपरिषदेत विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आमरण उपोषण करण्यात आले. जिल्हाप्रशासनाला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ नगरपरिषदेने शहरातील सायर मेडिकल ते जामनेर रस्ता या दरम्यान जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाचे बांधकाम केले आहे. त्या पुलावरून दिवसभर अनेक नागरिक व विद्यार्थ्यांची ये-जा होत असते. त्यामुळे पुलाचे काम एस्टिमेट अनुसार व गुणवत्तापूर्ण झालेले नाही. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी भुसावळ मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन ठेकेदारांची बिले अदा करू नये, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे यावल नगर परिषदेने ही शहराच्या शुशोभिकरणासाठी बगीचाची निर्मिती केली. त्यामध्येही एस्टिमेट नुसार कामे न करता कमी गुणवत्तेची आणि दर्जाहीन झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत देखील वंचीत बहुजन आघाडीने यावल मुख्याधिकारी यांच्याकडे कामाची चौकशी करण्यात करून दोषींवर कारवाईची विनंती केली होती.

परंतु भुसावळ व यावल नगरपरिषदेच्या दोन्ही मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी निवेदनात नमूद केलेल्या बाबींकडे दुर्लक्ष केले.  योग्य कारवाई न झाल्यामुळे मंगळवार २५ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जळगाव महानगर प्रमुख दीपक राठोड, जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, देवदत्त मकासरे, जितेंद्र केदार, प्रमिला बोदडे, विजय सावकारे, शांताराम अहिरे, कुणाल सुरडकर, लोकेश निंभोरे, आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.

Protected Content