जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत सर्वात महत्वाचे शहर असणार्या जळगावात अनोखी फाईट रंगणार आहे. अर्थात, एकीकडे महापालिकेतील निर्विवाद वर्चस्व, जोडीला मंत्रीद्वयी आणि लोकप्रतिनिधींची फौज तर दुसरीकडे एकटे गुलाबराव देवकर असा मनोरंजक सामना होणार असून यात बाजी मारणार्याला लोकसभेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगावात भाजप-शिवसेना युतीला अवाढव्य बहुमत आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुकीत येथून भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळणार असल्याचे गणित मांडण्यात आले आहे. वरकरणी पाहता हे समीकरण तसे शक्य वाटते. मात्र, ग्राऊंड लेव्हलवरील रिपोर्ट हा याला तडा देणारा आहे. जळगावात भाजपने एकहाती सत्ता मिळवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरी भरीव काम झालेले नसल्याचे जनतेत प्रचंड नाराजी आहे. यातील बारकाव्यांबद्दल नंतर केव्हा तरी चर्चा करू. मात्र आज या लढतीतला एक मनोरंजक पैलू आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत.
जळगावची जागा जिंकणे हे ना. गिरीश महाजन यांच्यासाठी अत्यावश्यक झालेले आहे. मुळातच तिकिटावरून सुरू झालेला खो-खो कधी संपतो यातच बराच वेळ गेला. त्यानंतर अमळनेरातील घटनेमुळे जळगाव भाजपची देशभरात नाचक्की झाली. अजूनही संपूर्ण मेनस्ट्रीम व सोशल मीडियातून यावरून खिल्ली उडवली जात आहे. गिरीशभाऊंनी स्वत:हून आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांची जबाबदारी असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र यात जळगावातील जागेमुळे त्यांचे टेन्शन वाढले आहे. अर्थात, ते येथे ठाण मांडून बसणार हे स्पष्ट आहे. त्यांच्या जोडीला ना. गुलाबराव पाटील यांचाही जळगाव शहराशी संबंध असल्याने ते महाजन यांना मदत करतील हे स्पष्ट आहे. युतीधर्म आणि एकूणच गिरीशभाऊंच्या मदतीची जाण ठेवून सुरेशदादांनाही मैदानात उतरणे भाग आहे. याच्या जोडीला आमदार राजूमामा भोळे, चंदूभाई पटेल, स्मिता वाघ, चंद्रकांत सोनवणे हे आमदारदेखील मदतीला आहेच. आता जळगाव महापालिकेत भाजपचे ५७ तर शिवसेना व अपक्ष असे एकूण ७२ नगरसेवक दिमतीला राहतीलच. याला पाच स्वीकृत सदस्यांची जोडदेखील मिळेल हे नक्की. अर्थात, आमदार उन्मेष पाटील यांच्यासाठी तब्बल ८४ लोकप्रतिनिधी ( यातील सुरेशदादा हे एकमेव माजी असून इतर विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत.) प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी मात्र एकटे गुलाबराव देवकर हेच बाजी लावत असतांनाचे चित्र आहे.
जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक नाही. तर शहरात या दोन्ही पक्षांचा एकही आमदार वास्तव्यास नाही. यामुळे अर्थातच महायुतीकडे असणारे लोकप्रतिनिधींचे बळ हे महाआघाडीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असल्याचे आजचे कागदावरचे चित्र आहे. अर्थात वरवर पहाता महायुती अतिशय प्रबळ वाटत आहे. मात्र अनेकदा कागदांवरील बळ हे मैदानात जोर-आजमाईश करतांना फुस्स होऊन जाते. इतिहासात याचे अनेक दाखले आहेत. यामुळे महायुती गाफील राहिल्यास याची जबर किंमत त्यांना मोजावी लागू शकते. तर महाआघाडीतर्फे गुलाबराव देवकर हे अतिशय शांतपणे कोणताही आव न आणता जळगावकरांना परिवर्तनाची साद घालत आहेत. आपल्याला शाळेच्या पुस्तकात शिकलेली डेव्हीड आणि गोलिएथ यांच्यातील लढाई आठवत असेलच. यात महाकाय आकाराच्या आणि अतिशय शक्तीमान असणार्या गोलिएथला डेव्हीड नावाच्या पोरसवदा तरूणाने हरविल्याची कथा सांगण्यात आलेली आहे. गुलाबराव देवकर हे पोरसवदा नसले तरी आज डेव्हीडच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमोर महायुतीची अजस्त्र ताकद आहे. डेव्हीडने बेसावध क्षणी गलोरच्या मदतीने हल्ला करून गोलिएथला लोळवले होते. गुलाबराव देवकरांच्या हातात कोणती गलोर आहे हे आजच सांगणे कठीण आहे. मात्र, जळगाव शहरातील अनेक अंडर करंट हे त्यांच्यासाठी अस्त्रांची भूमिका बजावू शकतात. ही शस्त्रे नेमकी कोणती? याबाबत आपण दुसर्या लेखात चर्चा करू. मात्र तूर्तास जळगावात ८४ विरूध्द एक असा लोकविलक्षण सामना अगदी रंगात आल्याचे दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. आता ही लाट आहे की नाही ? हे सांगणे कठीण आहे. मात्र सर्वशक्तीमान भासणार्या महायुतीसमोर एकटे उभे ठाकलेले गुलाबराव देवकर हे अनेकांच्या सहानुभूतीस पात्र ठरल्याची ग्राऊंड रिअॅलिटी नाकारता येणार नाही.
राजकारणाचे दुसरे नाव हे चमत्कार आहे. यातील एका चमत्काराला दुसरा चमत्कार लुप्त करत असतो. यामुळे आज महायुती ही आपल्या आजवरच्या वाटचालीतील सर्वात मोठ्या यशोशिखरावर असली तरी एखादा चमत्कार या स्थानाला धक्का देणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे महायुतीला बेसावध राहून चालणार नाही. तर गुलाबराव देवकरांना शक्तीऐवजी युक्ती वापरावी लागेल. असे झाल्यास जळगावच्या राजकीय इतिहासात नवीन चमत्काराचा जन्म होईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाहीच.