जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेला रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. रविवारी चार मैदानांवर झालेल्या सकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ, पुणे, नवरचना विद्यापीठ, गुजराथ आणि चारोतर विद्यापीठ गुजराथ हे चार संघ बाद पध्दतीतील पहिल्या फेरीत विजयी झाले.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीने या स्पर्धा होत असून महाराष्ट्र, गुजराथ व गोवा या तीन राज्यातील ६१ विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २६ फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या मैदानावर सकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरूध्द श्री बालाजी विद्यापीठ पुणे यांच्यात सामना झाला. २० षटकांच्या या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०३ धावा केल्या. बालाजी विद्यापीठाच्या संघाने २० षटकात ८ बाद ८६ धावा केल्या. पुणे विद्यापीठाने ११७ धावांनी हा सामना जिंकला. निळकंठ तणपुरे हा सामनावीर ठरला त्याने २३ चेंडूत ४० धावा केल्या.
सकाळी स्पर्धेचे उद्घाटन व्य.प.सदस्य तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष ॲड अमोल पाटील यांच्या हस्ते झाले. नाणेफेक अधिसभा सदस्य दिनेश खरात यांच्या हस्ते करण्यात आले. कुलसचिव डॉ विनोद पाटील यांच्याहस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, डॉ.किशोर पवार, डॉ.सचिन झोपे उपस्थित होते.
मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य संकुलाच्या मैदानावर चारोतर विद्यापीठ गुजराथ विरूध्द पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यात सामना झाला. व्य.प.सदस्य डॉ.पवित्रा पाटील यांनी सामन्याचे उद्घाटन केले. अकोला विद्यापीठाचा संघ अवघ्या १० षटकात ३५ धावांमध्ये बाद झाला. प्रत्युत्तरात चारोतर विद्यापीठाने ४.१ षटकात १ गडी बाद ३७ धावा करून ९ गडी राखत हा सामना जिंकला. कविश पटेल ने ४ षटकात १४ धावा देवून ५ गडी बाद केले. तो सामनावीर ठरला. सिनेट सदस्य स्वप्नाली महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्राचार्य स.ना.भारंबे, डॉ.एस.एस.बेलोरकर, डॉ.एस.डी.चौधरी, डॉ.आनंद उपाध्याय, डॉ.निलेश जोशी, प्रा.प्रवीण कोल्हे, एस.बी.तागड उपस्थित होते.
सावखेडयाच्या महेंद्र कोठारी क्रीडांगणावर नवरचना विद्यापीठ गुजराथ विरूध्द सुरेंद्र नगर विद्यापीठ गुजराथ यांच्यात झालेल्या सामन्यात नवरचना विद्यापीठाने ७ गडी राखत सामना जिंकला. सुरेंद्र नगर विद्यापीठाचा संघ १६.४ षटकात १३० धावांवर बाद झाला. नवरचना विद्यापीठाने १२.३ षटकात १३३ धावा करून सामना जिंकला. गणेश ठाकुर हा सामनावीर ठरला. सिनेट सदस्य ॲड केतन ढाके यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अनुभुती इंटरनॅशनल शाळेच्या मैदानावर भारती विद्यापीठ पुणे विरूध्द केंद्रीय गुजराथ विद्यापीठ गांधीनगर यांच्यात झालेल्या सामन्यात भारती विद्यापीठाने ७३ धावांनी सामना जिंकला. प्रारंभी भारती विद्यापीठाच्या खेळाडूंनी २० षटकात ६ बाद १८८ धावा केल्या. केंद्रीय विद्यापीठ गुजराथचा संघ २० षटकात सर्व बाद ११५ धावा करू शकला. अभिषेक होटा हा सामनावीर ठरला.