नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आज (सोमवारी) सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. मात्र, सध्या भाविकांची गर्दी असल्याने सायंकाळी महापूजेपूर्वीच अर्धा तास भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. तसेच, परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही असणार आहे.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी येत आहेत. आज (ता.22) सायंकाळी 5 वाजता ठाकरे यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात महापूजा आणि त्यानंतर गोदाघाटावर जाऊन गोदावरीची महाआरती होणार आहे. या नियोजनानुसार, खासदार संजय राऊत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.21) सायंकाळी श्री काळाराम मंदिरात पाहणी केली.
यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग व गर्दी होती. त्यामुळे आज मोठ्या संख्येने गर्दी असण्याची शक्यता आहे. महापूजा सुरू होण्यापूर्वीच मंदिरात भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे. महापूजा आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे साधारणत: अर्धा ते पाऊस तास मंदिरात भाविकांना प्रवेश बंद राहण्याची शक्यता आहे. तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.