मुंबई (वृत्तसेवा) विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्य हिस आग लागून झालेल्या दुर्घटनेत एक नौदल अधिकाऱ्याला प्राण गमवावा लागला आहे. या नौकेवरील तीन वर्षातील हा दुसरा अपघात आहे.
आयएनएस विक्रमादित्य ही नौका कारवार बंदरात प्रवेश करत असतानाच नौकेच्या एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागली. हे लक्षात येताच नौकेवरील लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांनी शौर्य दाखवत मोठ्या शर्थीने आग नियंत्रणात आणली. मात्र, या दरम्यान ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने कारवार येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आयएनएस विक्रमादित्य ही मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडची नौका असून या नौकेवरील तीन वर्षातील हा दुसरा अपघात आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.