मोठी बातमी : भोसरी भुखंड प्रकरणाची नव्याने होणार चौकशी !

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बहुचर्चीत भोसरी येथील भुखंड प्रकरणाची राज्य सरकार नव्याने चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी भोसरी येथे विकत घेतलेला भुखंड वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून ते सुमारे सव्वा वर्षांपासून कारागृहात आहेत. तर मंदाताई खडसे व एकनाथ खडसे यांना जामीन मिळालेला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी सरकारच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमिवर, भोसरी येथील भुखंड प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या भुखंडाच्या प्रकरणी पुण्यातील बंड गार्डन येथे एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकार्‍यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. मात्र, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी केला आहे. यावर न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे आता या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात येणार असल्याने खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content