मुंबई प्रतिनिधी । आज श्रीराम मंदिराच्या भुमिपुजनाची सर्वत्र चर्चा असतांना विद्यार्थी भारती संघटनेने चक्क प्रभू रामचंद्रांकडेच मोदींची तक्रार करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार नेमका आहे तरी काय ? खालील लिंकवर क्लिक करून वाचा.
आज सर्वत्र श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाचीच चर्चा सुरू आहे. अशातच विद्यार्थी भारती संघटनेने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात एक अनोखे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन उद्या म्हणजे ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता केले जाणार आहे. या संदर्भात संघटनेने एका निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात म्हटले आहे की, गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती संघटना अंतिम सत्राच्या परीक्षांविरोधात लढा देत आहे. या परीक्षा रद्द व्हाव्यात म्हणून विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र व ईमेल पाठविले. ट्विट केले आहे, रक्ताच्या ठश्यांचे पत्र पाठवले आहे. तसेच यासाठी उपोषणे केली, यूजीसीची प्रेतयात्रा काढली, मोदींची काकड आरती केली, मोदींच्या नावाने परीक्षा रद्द करा म्हणून बोंबा मारो आंदोलन केले. मात्र याचा काहीच परिणाम न येता सुप्रीम कोर्टातली सुनावणी १० ऑगस्टला ढकलली गेली आहे.
यामुळे आता विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. ज्या प्रभू रामाने आपल्या प्रजेच्या हिताचा कायम विचार केला, जनतेसाठी काम केलं त्या रामाला मानणारे मोदी आज जनतेचा व विद्यार्थ्यांचा विचार का नाही करत ? अश्या भूमिकेत विद्यार्थी भारती चे कार्यकर्ते रामाकडे मोदींची तक्रार करणार आहेत. हे आंदोलन विद्यार्थी भारतीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले आहे.