जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार ३ जानेवारी रोजी निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक आज पद्मालय विश्रामगृहात पार पडली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपद राष्ट्रवादी पक्षाकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक काल जाहीर होताच आज राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, वसंतराव मोरे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, सतीशअण्णा पाटील, संतोष चौधरी आदी नेत्यांची बैठक झाली. यात राष्ट्रवादीच्या दोन महिला सदस्यांच्या नावे आघाडीवर होती. यात जयश्री अनिल पाटील व डॉ. निलीमा पाटील यांच्या नावावर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, राष्ट्रवादीने पक्षाच्या जि.प. सदस्यांना व्हीप जारी केला असून महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कॉंग्रसचे डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष संदिपभैय्या पाटील, कॉंग्रेसचे जि. प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, दिलीप पाटील, आर.जी. नाना पाटील आदींची स्वतंत्र बैठक होऊन महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय निरीक्षक अनिल आहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. पक्षाचे जिल्हा परिषदेचे चारही सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, माजी आमदार चंद्रकात पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा झाली असून त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे आत्माराम कोळी व सेनेच्या सरला कोळी यांनी जातप्रमाणपत्र सादर न केल्याने ते अपात्र ठरले आहेत.
पक्षीय बलाबल
भाजप ३३
राष्ट्रवादी १५
शिवसेना १३
कॉंग्रेस ०४