विशाखापट्टणम वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (५/३५) आणि रवींद्र जडेजा (४/८७) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विजयासाठी केवळ दोनच बळी दूर असताना भारताने दुसऱ्या सत्रात २२ षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला. यापूर्वी शनिवारी भारताने आपल्या दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या (१२७) दमदार शतकाच्या जोरावर भारताने ३२३/४ च्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली होती. अशा प्रकारे आफ्रिका संघापुढे विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात आफ्रिकेने शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपताना ११ धावांवर आपला गडी गमावला. इथून पुढे आपला खेळ सुरू करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघासाठी रविवार आपल्या बाजूने वळवण्यात यश आले नाही.