नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । 2026 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अविस्मरणीय कामगिरी करत क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने फायनलमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा धावसंख्या विक्रम प्रस्थापित केला असून, या ऐतिहासिक यशाचा केंद्रबिंदू ठरला अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 50 षटकांत 9 बाद 411 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी तब्बल 412 धावांचे आव्हान ठेवले. अंतिम सामन्याच्या दडपणातही भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने एकहाती सामना आपल्या बाजूने वळवला. त्याने अवघ्या 55 चेंडूंमध्ये शतक झळकावत 80 चेंडूंमध्ये 175 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या स्फोटक डावात त्याने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकले असून, एकूण 175 धावांपैकी तब्बल 150 धावा या सीमारेषेबाहेरून मिळाल्या. त्याची ही खेळी पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह क्रिकेटविश्व थक्क झाले.
या खेळीसह वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज म्हणून त्याने नवा जागतिक विक्रम नोंदवला. तसेच संपूर्ण अंडर-19 विश्वचषक इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक करण्याचा मानही त्याने मिळवला आहे. याशिवाय, अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला असून, याआधी उन्मुक्त चंद (2012) आणि मनजोत कलरा (2018) यांनी हा पराक्रम केला होता.
भारताची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि 20 धावांवर पहिली विकेट गमावली. आरोन जॉर्जने 11 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात 142 धावांची भक्कम भागीदारी झाली. म्हात्रेने 51 चेंडूंमध्ये 53 धावांची संयमी खेळी करत डावाला स्थैर्य दिले.
मधल्या फळीत वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा आणि विकेटकीपर अभिज्ञान कुंडू यांनी उपयुक्त योगदान देत धावसंख्या वाढवली. शेवटच्या षटकांत कनिष्क चौहानने आक्रमक फलंदाजी करत 20 चेंडूंमध्ये नाबाद 37 धावा केल्या आणि भारताला 400 पार नेण्यात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडच्या गोलंदाजांना या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. सेबेस्टियन मॉर्गन, अॅलेक्स ग्रीन आणि जेम्स मिंटो यांनी प्रत्येकी काही विकेट्स घेतल्या, मात्र भारतीय फलंदाजांच्या आक्रमकतेपुढे त्यांची एक चालली नाही.



