Home क्रीडा भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी ‘टाटा’कडून मिळणार मोठ्ठ गिफ्ट 

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी ‘टाटा’कडून मिळणार मोठ्ठ गिफ्ट 


नवी मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला आहे. 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी मैदानावर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.

या विजयानंतर महिला क्रिकेट संघावर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आयसीसीकडून 39.55 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम आणि बीसीसीआयकडून तब्बल 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आता देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनेही या ऐतिहासिक यशाचा गौरव करत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने प्रत्येक महिला क्रिकेटपटूला आपली नवीन टाटा सिएरा कार भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सचे सीईओ शैलेन्द्र चंद्र यांनी सांगितले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने दाखवलेला खेळ हा दृढनिश्चय, शिस्त आणि प्रेरणेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर प्रत्येक भारतीयाचे हृदय जिंकले आहे. त्यांचा हा प्रवास प्रगती आणि अभिमानाचे प्रतीक आहे.” सिएरा मॉडेलची किंमत सुमारे 12.5 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ही गाडी टाटा मोटर्सच्या नव्या इलेक्ट्रिक आणि आधुनिक डिझाइन लाईनचा भाग आहे.

या विजयाचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेळाडूंशी प्रत्यक्ष भेटून साजरा केला. भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांना ‘NaMo 1’ अशी खास जर्सी भेट दिली आणि या ऐतिहासिक क्षणात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनीही संघाचे मनापासून अभिनंदन करत सांगितले की, “महिला क्रिकेटपटूंनी भारताच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे.”

फायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 बाद 298 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.3 षटकांत 246 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 52 धावांनी सामना जिंकत वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या विजयामुळे संपूर्ण देशात अभिमान, आनंद आणि क्रीडाभावनेचा उत्सव सुरू झाला आहे. हा विजय केवळ क्रिकेटमधील नव्या अध्यायाची सुरुवात नाही, तर भारतातील महिला सशक्तीकरणाचे नवे प्रतीक म्हणूनही इतिहासात नोंदवला जाईल.


Protected Content

Play sound