करणखेड्याचा हर्षल पाटील बनला चार्टर्ड अकाउंटंट  


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा या छोट्याशा गावातील हर्षल कैलास पाटील याने केवळ २२व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) बनत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) कडून सोमवारी जाहीर झालेल्या निकालात हर्षलने उच्च गुणांनी उत्तीर्ण होत यशाचे नवे पर्व रचले आहे. देशातील सर्वाधिक कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्षलने मिळवलेले यश त्याच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक ठरले आहे.

काही वर्षांपूर्वी करणखेडा गावातील कैलास आत्माराम पाटील हे आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी नवसारी येथे स्थलांतरित झाले. एका कंपनीत कामगार म्हणून त्यांनी आयुष्याची सुरुवात केली. स्वतः फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले असले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचेच, हा निर्धार त्यांनी कायम ठेवला. संघर्षमय आयुष्यातूनही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

हर्षलने आपल्या पालकांच्या या स्वप्नांना वास्तवात उतरवले. सीए फायनल परीक्षेचा निकाल लागल्यावर पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. वडील कैलास पाटील आणि आई कल्पना पाटील यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले. मुलगा चार्टर्ड अकाउंटंट झाल्याचा आनंद त्यांनी पेढे वाटून साजरा केला. संपूर्ण करणखेडा आणि नवसारी शहरात आनंदाची लाट उसळली असून गावकऱ्यांनी हर्षलचे अभिनंदन केले.

आपले मनोगत व्यक्त करताना हर्षल पाटील म्हणाला, “चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. सीएच्या तीनही परीक्षा पार केल्यानंतर कोणालाही नोकरी मागावी लागत नाही. फक्त सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचे सार्थक करणे ही माझी खरी जबाबदारी आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे.”

हर्षल पाटीलचे हे यश म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी कहाणीचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी तो आता नवीन प्रेरणास्रोत ठरत असून, ‘इच्छाशक्ती आणि कष्ट यांचा संगम असेल तर यश अटळ असते,’ हे त्याने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.