नवी दिल्ली वृत्तसंस्था । श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी -२० मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात येणार आहे. भारतीय संघाच्या विद्यमान समितीची ही शेवटची बैठक असून यात जसप्रीत बुमराहला संघाला पुन्हा संधी मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
निवड समितीच्या बैठकीत बुमराहच्या फिटनेसवर चर्चा होणार आहे. जर तो फिट असेल तर श्रीलंकेविरुद्ध पाच जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी किंवा १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड केली जाऊ शकते. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मालिकेसाठी दिल्लीत सोमवारी संघांची निवड होणार आहे. निवडसमिती दोन मालिकेसाठी खेळाडूंची निवड करतील. एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची ही अखेरची बैठक असणार आहे. प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा यांचा कार्यकाळ संपेल आणि नव्या वर्षात नव्या समितीची घोषणा केली जाईल. नव्या समितीमध्ये जतीन परांजपे, सरनदीप सिंह आणि देवांग गांधी हे सदस्य कायम राहतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराहची चार महिन्यानंतर पुन्हा संघात निवड होण्याची शक्यता आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो संघाबाहेर होता.