टोकिया वृत्तसंस्था | प्रदीर्घ काळानंतर पुरूष हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणार्या भारतीय संघाला बेल्जीयमने ५-२ असे पराभूत केल्याने आपले आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे आता कांस्य पदक मिळवण्यासाठी भारताला एका सामन्यातील विजयाची आवश्यकता आहे.
१९७२ नंतर पहिल्यांदाच पुरूष हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणार्या भारतीय हॉकी संघाकडून देशवासियांना मोठ्या अपेक्षा होत्या. अर्थात, उपांत्य फेरीत बेल्जीयम सारख्या अतिशय बलाढ्य संख्याविरूध्द लढत असल्याने ती चुरशीची होणार असल्याचा अंदाज होता, आणि झालेही तसेच ! बेल्जीयमने प्रारंभीच गोल करून आघाडी घेतली. लुईकने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पेनल्टी कॉर्नरवर हरप्रीतसिंग याने गोल करून भारताला बरोबरी मिळवून दिली. यानंतर मनदीप सिंगने केलेल्या गोलमुळे भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. तर अलेक्झांडर हेंड्रीक्सने केलेल्या गोलमुळे दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत झाले. मध्यांतरात दोन्ही संघ बरोबरीत होते.
दरम्यान, यानंतर दोन्ही संघांनी अतिशय आक्रमक खेळी करून गोल करण्याची मनसुबे केले. मात्र यात कुणालाही यश मिळाले नाही. उत्तरार्धात अलेक्झांडर हेंड्रीक्सने गोल करून आपल्या संघाला ३-२ अशी बढत मिळवून दिली. यानंतर पुन्हा हेंड्रीक्सने गोल केला. तर शेवटच्या क्षणांमध्ये गोल करून बेल्जीयमने हा सामना ५-२ असा जिंकला.
यामुळे भारतीय संघाच्या अंतीम फेरीतील आशा संपल्या असल्या तरी तिसर्या व चौथ्या क्रमांकासाठी होणार्या सामन्यात विजय मिळविल्यास आपल्याला कांस्य पदक मिळू शकते.