नवी दिल्ली (प्रतिनिधी) जगातील पाचव्या क्रमांकाला असणाऱ्या भारतीय अर्थव्यस्थेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारीमुळे जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
२०१७ साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका २.६५ ट्रिलियन डॉलर इतका होती. त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार २०१७ साली युनायटेड किंग्डम २.६४ ट्रिलियन डॉलरसहीत सहाव्या आणि फ्रान्स २.५९ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसहीत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सातव्या स्थानी होता. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळेच ही आकडेवारी मोदी सरकार आणि सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.