शिवसह्याद्री महानाट्याच्या ऑडिशनला तरूणाईचा उदंड प्रतिसाद ( व्हिडीओ )

shivsahyadri mahanatya audition

चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवसह्याद्री महानाट्याच्या ऑडिशनला तालुक्यातील तरूणाईने उदंड प्रतिसाद दिला असून याला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले.

चाळीसगाव मंगेश दादा चव्हाण मित्रपरिवार व चाळीसगावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत आयोजित केल्या जाणार्‍या शिवसह्याद्री या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या महानाट्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर काम करून आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. या अनुषंगाने इच्छुक हौशी कलावंतांची येथील पाटीदार भवन कार्यालयात प्राथमिक चाचणी (ऑडीशन) घेण्यात आली. यात महाविद्यालयीन व शाळकरी तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून आपले कलागुण या ठिकाणी सादर केले. यामुळे चाळीसगावकर कलावंतांना आपल्यातील कला दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे समाधान या कलाकारांच्या चेहर्‍यावर पाहावयास मिळाले.

येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी शिवसह्याद्री महानाट्याचे भव्य असे प्रयोग चाळीसगाव शहरातील सिताराम पैलवान यांच्या मैदानावर होणार असून या नाटकात जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक कलाकार काम करणार असून यात नावाजलेल्या टीव्ही मालिका तील कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना ही समावून घेतले जाणार असल्याने स्थानिक कलाकारांची ऑडिशन या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंगेश दादा चव्हाण यांनी उपस्थित कलाप्रेमी तरुण-तरुणींना सांगितले की, या महानाट्याच्या रूपाने जे प्रतिभावंत कलाकार पुढे येतील त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहून त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहील. नाटकाच्या सरावादरम्यान कुठल्याही भगिनी किंवा बंधूस कुठलीही अडचण आल्यास एक भाऊ म्हणून मला कधीही हाक द्या मी तुमच्या सोबत सदैव असेल. या मंगेश चव्हाण यांच्या भावनिक आवाहनाने उपस्थित सर्व कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांच्या चेहर्‍यावर दिसून आले.

दरम्यान, शिवसह्याद्री महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक अ‍ॅडव्होकेट विनय दाभाडे यांनी इच्छुक कलाकारांना नाटकाबद्दल विस्तृत स्वरूपात माहिती देऊन सराव आणि महानाट्याचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले तसेच या महानाट्याच्या रूपाने येणारा काही काळ संपूर्ण तालुका शिवमय होईल असेही यावेळी बोलून दाखवले. यावेळी व्यासपीठावर चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक सोमसिंग राजपूत, नगरसेविका विजया पवार, रंगगंधचे डॉक्टर मुकुंद करंबळेकर, सौ प्रतिभा मंगेश चव्हाण, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, भुषण पाटील, अजय जोशी, राजेंद्र मांडे आदी उपस्थित होते.

पहा : शिवसह्याद्री महानाट्याच्या ऑडिशनला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचा व्हिडीओ.

Protected Content