नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यातच आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनचे मोठे षड्यंत्र समोर आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचे षड्यंत्र आखत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशनमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा प्लान पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून रचण्यात आल्याचे उघड झाले आहे.
भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी आयएसआय आपल्या काश्मीरमधील एजेंटचा वापर करणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.