पुणे प्रतिनिधी । येथील टि-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून मालिका २-० अशी खिशात घातली.
आज येथे झालेल्या तिसर्या टि-२० सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि के.एल. राहूल यांनी भारताला अतिशय चांगली सुरूवात करून दिली. यानंतर शिखर धवन ५२ तर राहूल ५४ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहली, मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने २० षटकांमध्ये २०१ धावांपर्यंत मजल मारली. भारताने विजयासाठी दिलेलं २०२ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही, श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला. श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. श्रीलंकेकडून धनंजय डी-सिल्वाने ५७ तर अँजलो मॅथ्यूजने ३१ धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंज दिली. मात्र भारताने हा सामना जिंकला. यासोबत भारताने ही मालिका २-० अशी जिंकली.