इस्लामाबाद (वृत्तसंस्था) भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला उत्तर देणार नाही असे समजू नये, पाकिस्तान हल्ल्याला उत्तर देणार, असा धमकीवजा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप केले आहेत, अशा शब्दात इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे नकारात भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची चर्चेची तयारी असून या हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावे, असे आवाहनही खान यांनी भारताला केले आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे, अशा चर्चा सुरू आहेत. चालू वर्ष हे भारतामध्ये निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. भारताने हल्ला केला, तर पाकिस्तान शांत बसेल अशा भ्रमात राहू नका, हल्ला झाला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. तसेच एकदा युद्ध सुरू झाले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल.