विशाखापट्टणम वृ्त्तसंस्था । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने प्रथम कसोटीतील सलामीला येऊन त्याने १५४ चेंडूमध्ये खणखणीत शतक झळकावले. कसोटीतही सलामीमध्ये आपण शतकी सलामी ठोकू शकतो, हे त्याने सिध्द करुन दाखविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहितच्या टेस्ट करिअरवर एक नजर टाकल्यास हे लक्षात येते की त्याने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला टेस्टमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. या सामन्यात त्याला प्रथमच सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने १५४ चेंडूत शतक झळकावत आपल्या कसोटीतील पहिल्या स्थानाबाबत संघ व्यवस्थापन आपल्यावर विश्वास ठेवू शकते हे दाखवून दिले आहे. वनडे इंटरनॅशनल आणि टी-२० इंटरनॅशनलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहितला कसोटीत मात्र दोन वर्षांनंतर शतक ठोकण्याची संधी मिळाली. यापूर्वी त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात झालेल्या कसोटी सामन्यात नाबाद १०२ धावा कुटल्या होत्या. २९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. डावाच्या ५४ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेनुरनच्या बॉलवर एक धाव घेत त्याने विजयी शतकी सलामी दिली. हे त्याच्या कसोटी करिअरचं चौथं शतक आहे तर कसोटीत सलामीला आल्यानंतरचं पहिलं शतक आहे.