मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्यानंतरराज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज महाविकास आघाडीच्या नवनियुक्त खासदारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतले. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांवर मात करत विजय मिळवला आहे. राज्यात एकमेव अपक्ष उमेदवार सांगली मतदारसंघात निवडून आला. सांगली मतदारसंघाचा निकाल लागताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, सांगलीबाबत आमची चूक झाली. विशाल पाटील अपक्ष असले तरी आमच्यातीलच आहेत. ते आम्हालाच पाठिंबा देतील. त्यानंतर आता विशाल पाटील व विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ त्यानंतर विश्वजीत कदमांनी उद्धव ठाकरेंना सांगलीबाबत पुनर्विचार करण्याची केलेली विनंती, सर्व प्रयत्न फसल्यानंतर विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला जोरदार विजय, या सर्व पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.लोकसभेचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक मुंबईत बोलावली आहे. विशेष म्हणजे बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विशाल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगलीच्या जागेचा तिढा राज्यात गाजला होता. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत मतभेदही समोर आले होते. खुद्द शरद पवारांनी म्हटले की, सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरेंनी येथे उमेदवार जाहीर करताना घटक पक्षांना कल्पना देणे आवश्यक आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्कळ ठरल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन विशाल पाटलांनी जाहीर केलं की, आपला पाठिंबा काँग्रसलाच असणार आहे. गुरुवारी सकाळी विशाल पाटील मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्यासोबत विश्वजित कदमही असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पोहोचताच विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात बराच वाद रंगला होता. याच पार्श्वभूमीवर मतभेद दूर करण्यासाठी सांगलीतील हे दोन काँग्रेस नेते मातोश्रीवर जाणार आहेत.