महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही: – शरद पवार

मुंबई: वृत्तसंस्था| महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली
एका मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.

पवारांनी यावेळी ईडीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. ईडीमार्फत कारवाई म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं पवार म्हणाले. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्यच नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने गेल्या महिन्यात एक वर्ष पूर्ण केलं आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपला वाटत होतं. पण तसे झालं नाही. भाजप आणि शिवसेनेने २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद झाल्याने शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण निर्माण करण्यासाठी शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती.

Protected Content