नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघात ६ मे रोजी आज अखेरचा दिवस होता. अखेरच्या ही दिवशी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी माघार घ्यावी, अशी मनधरणी महायुतीकडून सतत होत होती. मात्र शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले असता त्यांना निवडणूकीसाठी बादली हे चिन्ह देण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने हेमंत गोडसेंना मोठा फटका बसेल असे बोलले जात आहेत.
शांतीगिरी महाराज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. महायुतीकडून तिकीट मिळण्याची आमच्या भक्त परिवाराला अपेक्षा होती. स्वार्थीपणा मनुष्य सोडत नाही, महायुतीने त्यांची उमेदवार जाहीर केला आहे. आमचे होर्डिंग लागले आहेत. लढा हिताचा, संघर्ष राष्ट्रहिताचा हा उद्देश समोर ठेऊन आम्ही लढतोय. खरं राजकारण कसे असते हे दाखवणार आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचे राजकारण गलिच्छ झाले आहे, यात बदल होणे गरजेचे आहे. महायुतीचे गिरीश महाजन, दादा भूसे, भाऊसाहेब चौधरी अशा अनेकांनी संपर्क साधला. अंजनेरी जन्मस्थानाचा विकास करणार आहे. शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव आणि त्यांचे इतर प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. लढायचं आणि जिंकायचं, असा आमचा निर्धार आहे.