जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहीरींची निवड रद्द करा, जामनेर पंचायत समीती कार्यालयात अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात याव्या अशा इतर मागण्यांसाठी जामनेर पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बेमुदत उपोषण लावण्यात आले. 

शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभेतील आलेल्या प्राधान्य क्रमाने पात्र लाभार्थ्यांची त्वरीत निवड न करता नवीन बेकायदेशीर मासीक सभेतून व आयत्या वेळेवर आलेल्या ठरावाला ग्राह्य धरून तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना नवीन वर्क कोड दिला गेला अशा बेकायदेशीर कामाला रद्द करून अगोदर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची निवड करावी, पंचायत समिती कार्यालयात अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्या, काही ग्रामसेवकांनी अपहार केलेला सिद्ध झालेला असतानाही संबधीतांवर काहीच कारवाई झाली नसुन त्यांच्यावर कारवाई केली जावी. फत्तेपुर ग्रामपंचायतीला विस्तार अधिकारी पदाची जागा असताना प्रभारी म्हणून ग्रामसेवक कामकाज चालवत आहे तेथे कायम अधिकारी नेमण्यात यावा अशा मागण्यांसाठी जामनेर राष्ट्रवादी कडुन बेमुदत उपोषण लावण्यात आले आहे.राजेंद्र पाटील, विलास राजपूत, किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, संदीप हिवाळे, प्रल्हाद बोरसे, दिपक रिछवाल, सागर कुमावत आदी उपोषणात सहभागी आहेत.

 

Protected Content