पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर – शेंदुर्णी रोडलगत कांद्याने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून पहूर शेंदुर्णी रस्त्यावर चौफुलीवर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून रस्त्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत.
आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कांद्याने भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच.15 ई.जी. 9989) चांदवडकडून पहुरमार्गे संबलपूर, ओरिसा येथे जात असताना पहूरजवळ शेंदुर्णी रोडलगत या खराब रस्त्यामुळे हा कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाला.
या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात. तरी संबंधितांनी जळगाव औरंगाबाद महामार्ग तसेच पहूर शेंदुर्णीकडे जाणाऱ्या चौफुलीवरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे; जेणेकरून अपघात याठिकाणी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.