
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलींच्या बालगृह आणि निरीक्षणगृहातील मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आकाश कंदील आणि पूजेच्या थाळी विक्री स्टॉलचे उद्घाटन बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मदत करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.
या उद्घाटन समारंभाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी, निरीक्षणगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव, उपअधीक्षक दिगंबर पाटील, संस्थेचे सचिव सुनील पाटील, कलाशिक्षक शोभना डोळे, समुपदेशक पूजा अडकमोल, परिविक्षा अधिकारी राहुल भालेराव आणि क्रीडा शिक्षक जावेद तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
निरीक्षणगृहातील मुलांनी आपल्या दैनंदिन अभ्यासाचा ताण सांभाळून, अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने हे आकर्षक आकाश कंदील तयार केले आहेत. कलाशिक्षक शोभना डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध रंगसंगती आणि डिझाईनचा वापर करून हे कंदील साकारले आहेत.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मुलांच्या कलात्मकतेला सलाम केला. त्यांनी जळगावातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले की, “जास्तीत जास्त जळगावकरांनी या मुलांच्या स्टॉलला भेट द्यावी. केवळ वस्तू म्हणून नव्हे, तर या मुलांना प्रोत्साहन म्हणून या आकर्षक आकाश कंदीलांची खरेदी करावी. तुमचा एक कंदील या मुलांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लावेल.” या उपक्रमामुळे मुलांच्या मेहनतीचे चीज होणार आहे.
अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी माहिती दिली की, “या आकाश कंदील आणि पूजा थाळीच्या विक्रीतून जमा होणारी संपूर्ण रक्कम मुलांच्या अभ्यासासाठी, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे मुलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होईल.”



