Home Cities जळगाव रामानंद पोलीस ठाण्याच्या नव्या ‘कॉर्पोरेट लूक’ इमारतीचे लोकार्पण !

रामानंद पोलीस ठाण्याच्या नव्या ‘कॉर्पोरेट लूक’ इमारतीचे लोकार्पण !


जळगाव लाईह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्याच्या नव्या आणि अद्ययावत इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस ठाणे आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर:
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीट हवालदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि वेगवान होईल.”

या लोकार्पण सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या १६ जीप आणि अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. २ कोटी १२ लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनांचा वापर आजपासून सुरू झाला आहे, ज्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता आणखी वाढण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound