Home Cities पारोळा पारोळ्यात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या २.३४ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ; नागरिकांना...

पारोळ्यात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या २.३४ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ; नागरिकांना मिळणार अधिक गतिमान नोंदणी सेवा

0
24

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले. तब्बल २ कोटी ३४ लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेली ही सुसज्ज इमारत आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाली असून, नोंदणीविषयक सेवा अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक आणि सुविधाजनक होण्यास मदत होणार आहे.

दुय्यम निबंधक कार्यालय हे जमीन-जुमल्याची खरेदी-विक्री, दस्त नोंदणी, विविध करार आणि इतर महत्त्वाच्या नोंदणी प्रक्रियांसाठी नागरिकांच्या थेट संपर्कातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. नागरिकांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, कार्यालयीन कामकाजासाठी प्रशस्त जागा उपलब्ध व्हावी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यक्षम वातावरण मिळावे, या उद्देशाने नवीन प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. २ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीतून साकारलेल्या या आधुनिक इमारतीमुळे नोंदणीविषयक कामकाज अधिक सुसूत्र पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना विविध कागदपत्रे व नोंदणी प्रक्रियेसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, कार्यालयीन कामकाजातही गतिमानता आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी आमदार ॲड. अमोल पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. शासनस्तरावर आवश्यक निधी आणि प्रशासकीय बाबींसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही इमारत प्रत्यक्षात साकारली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लोकार्पणप्रसंगी आमदार ॲड. अमोल पाटील म्हणाले, “विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा भौतिक सुविधा उभारणे नव्हे, तर सामान्य नागरिकाला शासनाच्या सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि सन्मानपूर्वक मिळणे हाही विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. पारोळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची ही प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे आणण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी काळातही पारोळा शहरासह संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जळगाव सहायक निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदारजी कुलकर्णी, जळगाव सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी घन्साराम राठोड, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिष पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, भाजपा शहराध्यक्ष तथा पारोळा विकासो उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी, सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश लोखंडे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष सखाराम चौधरी, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, माजी संचालक राजेंद्र पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, भाजपा प्रतोद तथा नगरसेवक अमोल शिरोळे, नगरसेवक छोटू पाटील, नजीरखान बेलदार, विनोद पाटील, दगडू पवार सर, भूषण टिपरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्यासह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, स्टॅम्प वेंडर संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि स्टॅम्प वेंडर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन प्रशासकीय इमारत सुरू झाल्यामुळे नागरिकांना नोंदणी प्रक्रियेसाठी अधिक व्यवस्थित आणि सुविधाजनक वातावरण मिळणार आहे. जमीन खरेदी-विक्री, दस्त नोंदणी व विविध करारांशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयीन सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही आधुनिक आणि प्रशस्त कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे. पारोळा शहरातील विविध पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय इमारतींच्या माध्यमातून विकासाला गती देण्याच्या प्रयत्नांमध्ये या नवीन इमारतीची भर पडली आहे. ‘सुविधांचा विस्तार, विकासाला नवा आकार’ या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देणारी ही इमारत पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी आधुनिक आणि सक्षम शासकीय सेवा व्यवस्थेचा नवा अध्याय ठरण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound