सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थिनी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. तर राज्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू असून अंमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती.जयश्री पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ.इंद्राणी मिश्रा, समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, उपविभागीय अभियंता सतीष वारुळे, सहायक अभियंता प्रतिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर नवीन वसतिगृह इमारतीत १०० विद्यार्थीनीना लाभ होणार आहे. रुपये ८ कोटी ५५ लाख खर्चातून इमारत पूर्ण झालेली असून सुधारित वाढीव कामांसाठी देखील ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ,त्यातून वसतिगृह अंतर्गत रस्ते इमारतीस संरक्षण भिंत , विद्यार्थिनींसाठी व्यायाम उपकरणे व गार्डन यांचा त्यामध्ये समावेश आहे. सदर सुसज्ज इमारतीत मुलींकरिता २७ स्वतंत्र खोल्या असून प्रत्येक खोलीत सौर ऊर्जा संचालित गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे.

स्वतंत्र अभ्यासिकाची खोली असून सौर ऊर्जा संचालित विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच ६ हजार चौरस फुटाचे भव्य कोर्टयार्ड तयार करण्यात आले असून अपंग विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र भोजन कक्ष व स्टोर रूम असून गृहपाल यांना राहण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी उद्घाटनानंतर वसतिगृह पाहणी करून विद्यार्थिनींनी शासनाने दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करून बांधकामा बद्दल समाधान व्यक्त केले आहे. सदर सोहळा यशस्वीपणे करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री.राजेंद्र कांबळे, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल श्री.धनंजय सपकाळे, समाज कल्याण निरीक्षक, तालुका समन्वयक, समतादूत व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..

Protected Content