मू.जे. महाविद्यालयात ‘फोटोग्राफी कोर्स’चा शुभारंभ

photography corse

जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई. सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभाग तसेच तत्त्वज्ञान विभाग यांच्या विद्यमाने फोटोग्राफी कोर्स सुरू करण्यात आला असून याचे उदघाटन महाविद्यालयाच्या नवीन कॉन्फरन्स हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातपुडा ऑटोमोबाइलचे संचालक किरण बच्छाव होते. व्यासपीठावर जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा.संदीप केदार, तंत्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ. रजनी सिन्हा उपस्थित होत्या.

 

किरण बच्छाव यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “आपल्या कलेला दिशा देण्याचे कार्य हे महाविद्यालय करीत असते. मात्र आपल्यातील उपजत कला ओळखून तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवात स्वतःलाच करावी लागते. फोटोग्राफी करताना केवळ हौस म्हणून न करता ती उत्कृष्ट कशी करता येईल. साधनांचा अभाव असताना तो फोटो कसा कलात्मक घेता येईल, याचे ज्ञान देखील असणे महत्त्वाचे असते. फोटोग्राफीत रोजगाराच्या अनेक संधी असून याकडे छंद म्हणून न बघता रोजगार म्हणून बघितल्यास अर्थार्जन चांगले होते.”

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. हा कोर्स सगळ्यांसाठी खुला असून प्रवेश देणे सुरु आहे. याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. यात फोटोग्राफीतील विविध विषय तसेच तांत्रिक विषयासोबत अद्यायावत फोटोग्राफी कशी करावी, याचे मार्गदर्शन तज्ञ व्यक्ती करणार आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्रा.संदीप केदार मो. 84594 39773 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content