जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धा शुक्रवार ७ डिसेंबर रोजी विद्यापीठात झाली. पदवीप्रदान सभागृहात सकाळी जळगाव येथील ओरीएंट सिमेंट प्रा.लि.चे उपाध्यक्ष अतुलकुमार अग्रवाल यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी ओरीएंट सिंमेंटचे क्षेत्र व्यवस्थापक रोहित जोशी, कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व्य.प. सदस्य प्रा. पवित्रा पाटील, प्रा. म. सु. पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे निरीक्षक प्रा. राकेश रामटेके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, डॉ. विशाल पराते आदींची उपस्थिती होती.
कोरफडच्या रसापासून प्रिझर्व्हेटीव तयार करणे, खत निर्मिती, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, क्राऊड फंडींग, ई कॉमर्स, टाकाऊ प्लॅस्टीक पासून उपयोगी वस्तू बनवणे, एआय तंत्रज्ञानाची माहिती, मशीन लर्निंग, जल सुरक्षा, बांग्लादेश संघर्ष, वाढती गुन्हे व पोलिस संख्या, बायोडिग्रेडेबल, फुड पॅकेजिंग, कोटींग, इको फ्रेंडली पेंट अशा विविध विषयांवरील नवकल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे प्रकल्प विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या / संशोधक शिक्षकांच्या आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आले.
आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन करतांना अतुलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धा वारंवार व्हाव्यात जेणे करुन उत्कृष्ट नवनवीन संकल्पनांवर आधारीत समाजोपयोगी संशोधन निर्माण होईल. श्री. रोहित जोशी यांनी यावेळी सांगितले की, संशोधन स्पर्धा ही काळाची गरज आहे. त्यातून उद्याचे संशोधक घडतात. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, आविष्कार स्पर्धेत उपयोजित संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्याकरीता संशोधन वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता आविष्कार स्पर्धा, कला गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता युवक महोत्सव, साहस गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता आपत्कालीन शिबीरातून प्रशिक्षण, क्रिडा गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विविध क्रिडा स्पर्धा, रासेयोची आव्हान स्पर्धा अशा विविध स्पर्धां विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आयोजित करत असते व त्यातून देशाचे उत्तम नागरिक घडतात.
या आविष्कार स्पर्धेत एकूण ३०० विद्यार्थी / संशोधक शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये १९० पोस्टर्स व १० मॉडेल्स यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी व शिक्षक तसेच कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेतील संशोधक शिक्षक या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात नाविन्यता तर होतीच मात्र भविष्यातील संशोधनाची बीजे देखील दिसून येत होती. प्रास्ताविक प्रा. रमेश सरदार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.विजय घोरपडे तर आभार प्रा. विशाल पराते यांनी मानले. या स्पर्धेसाठी गठीत केलेल्या विविध समिती मध्ये सहभागी प्रशाळातील शिक्षक व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.