विद्यापीठात उद्योग संवाद शिखर परिषदेचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तरूणांनी आपल्यातील क्षमता ओळखुन व्यवसाय करण्यासाठी पावले टाकावीत. मात्र व्यवसायात होणारे बदल स्वीकारून मेहनत आणि कष्ट करण्याची जोड दिली तर व्यवसाय-उद्योगात निश्चित यश प्राप्त होईल असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (CAIT) अध्यक्ष व उद्योजक नितीन बंग यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने विद्यापीठ – उद्योग संवाद शिखर परिषदेचे आयोजन मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन करतांना श्री. बंग बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विन्ले पॉलीमर्सचे मुख्य कार्यकारी प्रमोद संचेती, सोयो सिस्टीमचे मुख्य कार्यकारी किशोर ढाके उपस्थित होते तर अतिथी म्हणून रवीकिरण कोंबडे तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची उपस्थिती होती. या संवाद शिखर परिषदेला विद्यापीठ प्रशाळांमधील ३०५ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला. श्री. बंग म्हणाले की, भविष्यात नोक-यांची संधी कमी होत चालली आहे अशा वेळी आपल्यातील क्षमता ओळखुन संधीचा शोध घ्यायला हवा, चरितार्थाची साधने आपण शोधायलाच हवीत. प्राप्त झालेल्या टक्केवारीपेक्षा क्षमता आणि अनुभव यांना अधिक महत्व आहे.  क्षमतेनुसार व्यवसाय करा. यश-अपयशाची पर्वा करू नका. व्यवसायात लवचिकता ठेवा. नवीन बदल स्वीकारा आणि मित्रांच्या संपर्कात सतत राहा. कारण त्यातुन व्यापार वाढीला मदत होते. सकारात्मक विचार आणि मेहनत व कष्ट करण्याची तयारी यातूनच यशस्वी व्हाल असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

उद्योजक प्रमोद संचेती यांनी स्वप्नाला मेहनतीची जोड देण्याचा सल्ला दिला. व्यवसायातील तंत्रज्ञान अवगत केले तर स्पर्धेत टिकून रहाल असे सांगताना त्यांनी उद्योगांना हवे असणारे कुशल मनुष्यबळ मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. किशोर ढाके यांनी उद्योगाच्या गरजा आणि सध्याचे दिल जाणारे शिक्षण यामध्ये मोठी दरी असुन कौशल्य नसलेले मनुष्यबळ तयार होते. विद्यार्थ्यांकडे संवाद कौशल्य, सकारात्मक विचार यांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकत असतांना केवळ पाठांतर न करता व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. रवीकिरण कोंबडे म्हणाले की, भारताकडे मोठी क्षमता असलेला देश म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे तरूण पिढीची जबाबदारी वाढली असून विद्यापीठांकडून उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी विद्यापीठाने त्या पध्दतीचे अभ्यासक्रम आखावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी हे विद्यापीठ तिन्हीही जिल्ह्यातील प्रत्येक समाज घटकांचे विद्यापीठ असुन सर्व घटकांशी संवाद वाढविण्याचा विद्यापीठाकडून प्रयत्न कला जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपला महत्व असल्यामुळे उद्योजकांच्या पाठिंब्याची विद्यापीठाला गरज आहे. विद्यापीठात उत्तम प्रयोगशाळा आहेत, संशोधन आहे आणि विश्लेषण करण्याची क्षमता आहे. त्यांचा फायदा या भागातील उद्योजकांनी करावा असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले. प्रारंभी सीटीपीसीचे समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भुमिका सांगितली. प्रा. जी. ए. उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यश सोनवणे, सोनाली दायमा व प्रा. सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपसमन्वयक प्रा. उज्ज्वल पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटनानंतरच्या झालेल्या चर्चेत संतोष शिवाने (पुणे), संदीप जोशी (संभाजीनगर), गौसुद्दीन खान (हैद्राबाद), मोहम्मद फारूख खान (संभाजीनगर) तसेच उमेश सेठीया, सुरज धाजल, भाऊसाहेब चिमाटे, संजय पानीकर, डॉ. देवदत्त गोखले, संजय पवार, अरूण महाजन, हिमांशु उके, विरेंद्र छाजेड, प्रवीण सिंग, संजय शहा, संतोष बिरारी, रश्मी गोखले, रोहन मंत्री, भास्कर माळी, अनिल पवार, डॉ. जितेंद्र नारखेडे, डॉ. विशाल पराते, पवन मेश्राम यांनी भाग घेतला.

Protected Content