पारोळा प्रतिनिधी | तालुका शिवसेनेतर्फे पारोळा शहरात शिव मदत केंद्राचे उदघाटन आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मदत केंद्रातून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हवी ती मदत करून त्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत.
शिवसेना ही कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शिवसेनेने उभारलेल्या “शेतकरी मदत केंद्राचा” दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. गेल्या पंधरवाड्यात परतीच्या अवकाळी पावसाने पारोळा एरंडोल मतदार संघात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सरसकट पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत व्हावी. तसेच वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा पीके आडवी झाल्याने हिरावला गेला आहे. त्यामुळे जनावरांना चाऱ्याचाही प्रश्न बिकट झाला आहे. ह्या पावसात घरांची पडझड, फळबागा, व शेतीमाल यांचे नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे तातडीने होऊन भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना मदती व पंचनाम्याबाबत काही अडचणी असल्यास शिवसेनेच्या ‘शेतकरी मदत केंद्र’ शेतकी संघ, पारोळा ह्याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह तालुका प्रमुख आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, बापु मिस्तरी व आदी सर्व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.