ज्याच्या मतदारसंघात कार्यक्रम त्यालाच निमंत्रण नाही; ठाकरे गट संतप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई-नवी मुंबईतील दौऱ्यात मानापमान नाट्य रंगले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. मात्र, या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले आहेत. तर, ठाण्याचे खासदार राजन विचारे  यांचे नाव दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात यावे आणि सुरू व्हावे यासाठी विचारे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघात असलेला दिघा गाव रेल्वे स्थानक आहे. त्याशिवाय, बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो प्रकल्पही त्यांच्या मतदारसंघातील आहेत. मात्र, लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दिघा स्टेशनसाठी आपण पाठपुरावा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

आता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत आपल्याला डावलले असून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा यावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले.

दिघा रेल्वे स्थानक स्थानक तयार होऊन काही महिने झाले होते. मात्र, तरीदेखील त्याचे उद्घाटन करण्यात येत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, राजन विचारे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती.

 

Protected Content