चित्रपट महामंडळाच्या २ विद्यमान , १२ माजी संचालकांचे सदस्यत्व रद्द !

कोल्हापूर:: वृत्तसंस्था । अखिल भारतीय चित्रपट महामंडळमध्ये राजकारणाचा नवा तमाशा सुरू झाला आहे. विनापरवाना व अनावश्यक खर्च केलेली रक्कम न भरल्याने दोन विद्यमान संचालकासह बारा माजी संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. .

दरम्यान, सभासदत्व रद्द झालेल्यामध्ये माजी अध्यक्ष विजय पाटकर, सतीश रणदिवे, सतीश बिडकर , अलका कुबल, प्रिया बेर्डे अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

सन २०१० ते १५ या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळाने अनेक गोष्टीवर अनावश्यक खर्च केला होता. परवानगी न घेता केलेला खर्च , घेतलेले मानधन या संचालकांनी महामंडळात भरावे असा आदेश धर्मादाय आयुक्त व न्यायालयाने दिला होता. दहा लाखापेक्षा अधिक असलेली ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे .

ही रक्कम भरण्याची मुदत तीन फेब्रुवारीपर्यंत होती . तरीही या आजी व माजी संचालकांनी ती न भरल्याने अखेर शुक्रवारी या सर्वांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा नोटिसा सर्वांना पाठविण्यात आल्या .यामुळे सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यात महामंडळात सतत राजकारण सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांचे पद घालण्यात आले होते. त्यानंतर मेघराज भोसले यांनी प्रतिडाव खेळत आपले पद वाचवले. आता तर त्यांनी या डावात असणाऱ्या अनेकांचे सभासदत्व रद्द केल्याने महामंडळातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सभासदत्व रद्द झालेल्या मध्ये विद्यमान संचालक सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांच्यासह माजी संचालक विजय पाटकर, अलका कुबल, प्रताप सुर्वे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, बाळू बारामते, सदा सूर्यवंशी, विजय कोंडके, प्रिया बेर्डे , संजीव नाईक, अनिल निकम व सुभाष भुरके यांचा समावेश आहे.

Protected Content