यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २३ मे रोजी बुध्द पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम शेख, व सहा. वनसंरक्षक चोपडा प्रथमेश वि. हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा वनक्षेत्रापासुन ते रावेर वनक्षेत्रामधील ठिकठिकाणी जंगल भागात प्राणी गणनेसाठी मचान तयार करण्यांत आलेले आहेत. यावल वनविभागात चोपडा वनक्षेत्रात ०३ मचान, वैजापुर वनक्षेत्रात ०७ मचान, अडावद वनक्षेत्रात ०४ मचान, देवझिरी वनक्षेत्रात ०४ मचान, यावल पूर्व वनक्षेत्रात ०७ मचान, यावल पश्चिम वनक्षेत्रात ०६ मचान तर रावेर वनक्षेत्रात १२ मचान असे एकुण ४३ मचान यावल वनविभागात तयार करण्यांत आले आहे.
सदर मचाण वर ५ ते ६ व्यक्ती एका वेळेस बसु शकतात.
बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपुर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यावल वनविभागातील वन्यप्राणी गणनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमे-याव्दारे देखील गणना केली जात असुन नवखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विदयार्थी यांना देखील संपुर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा तसेच दर्शन देणा-या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणुन यावल वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले आहे. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात निसर्गानुभव घेत असतांना तसेच रात्री प्राणी प्रगणना करीत असतांना प्रामुख्याने बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, यांसह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षीही आढळतात जंगल सफारीच्या दरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभवही मिळतो.
यावल वनविभागातील नैसर्गिक पाणवठयांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुध्द पाणी पुरवठा करणे, पाणवठया शेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरु आहेत. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात वन्यजीवांचा थरारक अनुभव घेण्यासाठी यावर्षी यावल वनविभागाने बुध्द पौर्णिमेचे अवचित्त साधुन प्राणीगणनेसाठी निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांना सुवर्ण संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. प्राणीगणना २३ मे २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/AWnHT२HRDANJE CA या संकेतस्थळावर जावून पर्यावरणप्रेमी यांनी रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. प्रती व्यक्तीसाठी यावल वनविभागा मार्फत ५००/- रुपये इतका शुल्क आकारण्यांत येणार आहे. सदर शुल्कातून निसर्ग अनुभवणा-या व्यक्तींसाठी भोजन व इतर व्यवस्था करण्यांत आली आहे. तसेच खालील दिलेल्या QR Code मार्फत ही निसर्ग प्रेमींना त्यांचे रजिष्ट्रेशन करता येणार आहे. तरी निसर्गप्रेमींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दयावा.
सदर कार्यक्रमाचे नियोजन निनू सोमराज मॅडम, म. वनसंरक्षक सो धुळे (प्रा.) वनवृत्त धुळे, श्री. जमीर एम. शेख, सर म. उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव, श्री. प्रथमेश वि. हाडपे, म. सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुर करीत आहेत.