मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, याच मुंबईत सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गृह विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल २,१९,०४७ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, यात एकूण ३८,८७२ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत एकूण ५१,८७३ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंद झाले असून, यामध्ये तब्बल १२,४०४ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे आकडेवारी दर्शवते. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी आता आर्थिक गुन्ह्यांसाठीही पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईनंतर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत पुणे दुसऱ्या स्थानी आहे. पुण्यात एकूण २२,०५९ प्रकरणे नोंद झाली असून, त्यातील फसवणुकीची रक्कम ५,१२२ कोटी ६६ लाख इतकी आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात ४३,८०२ प्रकरणे दाखल झाली असून, त्यातील १२,११५ प्रकरणे पिंपरी-चिंचवडमध्ये तर ४३४ कोटी ३५ लाखांची फसवणूक पुणे ग्रामीण भागात झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात ३५,३८८ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील ८,५८३ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ठाणे शहरात २०,८९२, नवी मुंबईत १२,२६० आणि ठाणे ग्रामीण भागात १,२३६ गुन्हे दाखल झाले आहेत. मीरा भाईंदर आणि वसई-विरारमध्येही ११,७५४ गुन्ह्यांची नोंद झाली असून, यामध्ये १,४३१ कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
विदर्भात नागपूर शहरात ११,८७५ तर ग्रामीण भागात १,६२० गुन्हे नोंद झाले असून, यामध्ये १,४९१ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिकमध्ये ९,१६९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील फसवणुकीची रक्कम १,०४७ कोटी ३२ लाख इतकी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ६,०९० प्रकरणे, अमरावती जिल्ह्यात २,७७८ प्रकरणे आणि सोलापूर जिल्ह्यात ३,४५७ प्रकरणे नोंद झाली आहेत. या शहरांमध्ये अनुक्रमे ५४३ कोटी ६१ लाख, २२३ कोटी ५९ लाख आणि ३९४ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात वाढत्या आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेषत: सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि कडक कायदे अमलात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृतीही महत्त्वाची ठरणार आहे.