जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा रविवार दि. ३ मार्च रोजी जीर्णोद्धार करून ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन वातावरण भक्तिमय केले.
सकाळी धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील कृष्णदासजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रोच्चारात मंदिरात देवतांची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी देवता उत्थापन,प्रातः पूजन, पूर्णाहुती आदी विधी करण्यात आले. या मंदिरात भगवान महादेव, श्री गणेश, श्री गोपालकृष्ण यांच्यासह त्रिपुरसुंदरी माता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाविकांनी भगवान महादेवाचा जयघोष केला. नंतर प्रभागातील माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, प्रा. सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थिती दिली होती.
असा आहे मंदिराचा इतिहास
श्रीकृष्ण कॉलनी येथील सन १९८२ पासून गेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. मागील अनेक वर्षात या मंदिराचा विकास होत होता. मंदिराचा सभामंडप देखील उभारण्यात आला. आता या मंदिराला नूतनीकरण करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिरात भगवान महादेव, श्री गणेश, श्री गोपालकृष्ण यांच्यासह त्रिपुरसुंदरी माता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. त्रिपुरसुंदरी मातेचे हे खान्देशातील एकमेव मंदिर आहे. यातील श्री गणेश, श्री गोपालकृष्ण व त्रिपुरसुंदरी माता यांच्या मूर्ती ह्या राजस्थानमधील जयपूर येथून आणल्या आहेत. तर शिवलिंग हे मध्यप्रदेशातील बकावा येथून आणले आहे. या मंदिरावर २७ फूट कळस उभारण्यात आला आहे. अत्यंत सुंदर व आकर्षक अशा रचनेत हे सिद्धेश्वर मंदिर भाविकांना आकर्षित करीत आहे.