जळगाव प्रतिनिधी । घरफोडी गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयीत आरोपीने जिल्हापेठच्या पोलीस कोठडीत स्वतःवर लोखंडी पट्टीने वॉर करून जखमी करून घेतल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) सायंकाळी घडली.
याबाबत माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात अगोदरच अटक असलेला संशयित आरोपी सोनूसिंग बावरी याला अटक करण्यात आली आहे. त्याने शहरातील अनेक घरफोड्याची कबुली दिली असून त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात रामानंद नगर पोलिसांनी सोनूसिंगचा लहान भाऊ मोनूसिंग बावरी याला गुरुवारी अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी नसल्याने संशयित मोनुसिंगला जिल्हापेठ कोठडीत टाकण्यात आले. मोनुसिंगला कोठडीत टाकताच त्याने पगडीला असलेल्या लोखंडी क्लिपने स्वतःच्या हातावर व छातीवर वार करून जखमी करून घेतले. त्याला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.