मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप

लखनऊ (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशमध्ये २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल अशी या दोषींची नावे आहेत. मुझफ्फरनगरमधील कवाल या गावात २०१३ साली दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या दोघांच्या हत्येप्रकणी कनिष्ठ न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हिमांशू भटनागर यांनी हा निर्णय दिला.

 

ऑगस्ट २०१३ रोजी कवाल या गावात गौरव आणि सचिन या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील अंजूम खान यांनी सांगितले की, बुलंदशहर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. सुरक्षेअभावी सर्व दोषींना न्यायालयात नेता आले नाही आणि शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी झालेल्या दंगलीमध्ये मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये 60 जण ठार झाले होते. सरकारी वकील कुमार त्यागी यांनी सांगितले की, 2013 मध्ये सचिन आणि गौरव यांच्याशी आरोपींचा मोटारसायकल अपघातावरून वाद झाला होता. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी भडकलेल्या दंग्यामध्ये आरोपींपैकी शाहनवाज याचाही मृत्यू झाला होता.

Add Comment

Protected Content