मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुर्हा काकोडा परिसरात पोलिसांनी आज केलेल्या नाकाबंदीदरम्यान धुळे येथील अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कामगिरीमुळे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळ धारदारजवळ हत्यारे होते. सदर आरोपी या परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या बेतात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा बेत हाणून पाडला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलिस ठाणे हद्दीत वडोदा गावाजवळ जळगाव जामोद रस्त्यावर विभागीय पोलीस अधिकारी श्री. नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान एक मोटार सायकल तपासणीसाठी न थांबता पळून जात होती. त्यावेळी सपोनि प्रमोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल, खंदारे, भगवान पाटील , अनिल सोननी,सुरेश पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल यांनी पाठलाग करून पकडले. आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे कोयता आणि सुरी सारखे धारदार हत्यार मिळून आले. संशयितांची अधिक चौकशी केली असता, त्यातील दिलीप भानु सिंग पवार (रा.जामदार ता.साक्री जि. धुळे) याच्या विरुद्ध निजामपूर पो. ठाणे जि. धुळे या ठिकाणी दरोड्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. धुळे येथून अनेक दिवसांपासून त्याचा पोलिस शोध घेत होते. नाकाबंदीदरम्यान सदर हे आरोपी निष्पन्न झाले आहेत. आरोपींकडून कोयता व सुरी सारखे धारदार हत्यार तसेच मोटार सायकल क्र (MH 18 AT- 6989)हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.