जळगाव (प्रतिनिधी) येथील नवीन बस स्थानकात हातसफाई करणाऱ्या अट्टल चोरट्यास प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना आज दुपारी घडली. गणेश राजेंद्र ठाकूर (वय २७, रा. गेंदालाल मिल) असे चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, संशयित चोरटा ठाकूरच्या साथीदाराकडे मोबाईल व पाकिट असल्याने त्याने पोलिसांना सांगितले. तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील गणेश वासुदेव बागड (वय २७) ये शनिवारी त्यांच्या आईच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी शहरात आला होता. डोळे तपासणीनंतर पुन्हा धरणगावला जाण्यासाठी बसस्थानकात आल्यावर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गणेशचा मोबाईल लांबविला. तसेच शहरातील खोटेनगर परिसरातील वाटीका आश्रम येथील रहिवासी कैलास काशिराम निकम (वय ५३) हे रेल्वे कंत्राटदाराकडे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. पाचोरा येथे रेल्वेचे काम सुरु असल्याने श्री. निकम शनिवारी बसने पाचोरा जाण्यासाठी बसस्थानकात आले होते. पाचोरा जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत ठाकुर याने त्यांचे खिशातील पाकिट लांबविले आणि पळ काढायला लागला. परंतू प्रवाशांनी त्याला पकडले. त्यानंतर बसस्थानकात गस्तीवर असलेल्या जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील नाना तायडे, शेखर जोशी, प्रशांत जाधव, हेमंत तायडे यांनी नागरिकांनी पकडून ठेवलेल्या गणेश ठाकूर या संशयितास ताब्यात घेतले.