नवीन नियुक्तीशिवाय शिक्षकांच्या ‘अर्थपूर्ण’ आंतरजिल्हा बदल्या थांबवा ; डॉ. चौधरी

WhatsApp Image 2019 08 18 at 2.59.53 PM

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहे. जर या शिक्षकांची बदली झाली तर, शहरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शिक्षकांच्या बदल्या थांबवाव्यात अन्यथा विद्यार्थी पालकांना घेऊन मनपात शाळा भरविण्याचा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी माजी प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. सलीम पटेल, शाळा क्र १९ चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमजद रंगरेज, रईस शेख, ज्ञानेश्वर कोळी आदी हजर होते. मनपाच्या शहरात सध्या मराठी माध्यमाच्या १४ शाळा असून उर्दू माध्यमाच्या १० शाळा आहेत. तसेच हिंदी माध्यमाची १ शाळा आहे. एकुण २५ शाळा मनपाच्या असून त्यापैकी ४ शाळा सामाजिक संस्थांना चालविण्यासाठी मनपाने दिल्या आहे. उर्वरीत २१ शाळांकडे सत्ताधारी व प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यापैकी अनेक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहे. जर या शिक्षकांची बदली झाली तर, अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे बदलीसाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे तसेच जोपर्यंत नवीन शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शिक्षकांची बदली न करण्याचा ठराव करण्यात यावा, त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांचे आवश्यक असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात यावे, पिंप्राळा हुडको भागातील शाळा क्र. १९ व ३५ या शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०१८ च्या आकड्यानुसार मनपाच्या २५ शाळांची पट संख्या ४९५३ इतकी होती. या वर्षी ती संख्या ४६००च्या आसपास आहे. त्यापैकी जवळ पास ३३०० विद्यार्थी उर्दू माध्यमातील आहेत. संच मान्यतेनुसार उर्दू माध्यमाच्या शाळांना ११० शिक्षक असणे आवश्यक आहे. परंतु सध्या फक्त ८२ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी अजून ७ जणांनी आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहेत. दोन तीन शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. तर शिक्षण मंडळाचे प्रभारी श्री रामोळे हे मनपातील सत्ताधारी यांना हाताशी घेऊन अर्थपूर्ण तडजोडी करून शिक्षकांच्या बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मनपा महासभेत ठराव मांडण्याचा घाट घालत आहेत असा आरोप केला आहे. उर्दू माध्यमाच्या १० शाळांपैकी ७ शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक असून तेथे नियमित मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे.

Protected Content