पहिल्या अधिवेशनात अर्थमंत्री ‘या’ दिवशी अर्थसंकल्प सादर करणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. तसेच त्यांच्याबरोबर इतर ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून सर्व मंत्र्यांमध्ये खातेवाटपही पूर्ण झालं आहे. दरम्यान, आता सर्वांना नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू शकतात. अर्थमंत्री १ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काही वेळापूर्वी एक निवेदन जारी केल. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, १८ व्या लोकसभेचं पहिलं सत्र येत्या २४ जूनपासून सुरू होईल. पहिलं अधिवेशन सुरू होताच सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाईल. तसेच लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ही महत्त्वाची कामं उरकली जातील. सर्व नवीन खासदारांचा शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तसेच पुढील पाच वर्षांसाठी नव्या सरकारचा संकल्प सादर करतील.

दरम्यान, किरण रिजिजू यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, १८ व्या लोकसभेचं पहिले सत्र २४ जूनपासून सुरू होईल, जे ३ जुलैपर्यंत चालेल. या सत्रात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर चर्चा घडवून आणली जाईल. तसेच राज्यसभेचं २६४ वं सत्र २७ जूनपासून सुरू होईल. राज्यसभेचं सत्र देखील लोकसभेबरोबर ३ जुलै रोजी समाप्त होईल. राज्यसभेत २७ जून रोजी राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाची सर्व सदस्यांशी ओळख करून देतील.

Protected Content