तासगाव मतदारसंघात शरद पवार गटाकडून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीतील राज्यातील विधानसभेच्या जागा वाटपावर प्राथमिक पातळीवर बोलणी सुरू असताना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळचा उमेदवार शेतकरी मेळाव्यात जाहीर केला. माजी उपमुख्यमंत्री स्व. आरआर आबांचे वारसदार म्हणून रोहित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरत असल्याने औत्सुक्य तर राहणारच पण यावेळी त्यांनी मोठा अथवा छोटा पैलवान मैदानात आला तर मी लढण्यास सज्ज असल्याचे सांगत मतदार संघातील पारंपारिक विरोधक भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना खुले आव्हान दिले आहे.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातच लढत होण्याची चिन्हे आहेत. तसा हा मतदार संघ स्व. आरआर आबांना कायम साथ देणारा असला तरी एकेकाळी माजी खासदार पाटील यांनी आबांनाही जेरीस आणले होते. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ ३ हजार ४९७ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ६ हजार ३०४ मतांनी आरआर आबा विजयी झाले होते. यामुळे आबांचा हा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मानला जात नव्हता. यामुळे माजी खासदार पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले होते. यानंतरच आबांसाठी हा मतदार संघ सुरक्षित झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काकांनी भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकी पटकावली. यानंतरच तासगावचा राजकीय संघर्ष सौम्य झाला. अंतर्गत साटेलोट्यात खासदारकी काकांना आणि आमदारकी आबा गटाला अशी राजकीय सोयरीक मान्य करण्यात आली.

Protected Content