छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगरात लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा सामाना शिवसेने शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याचे दिसून आले. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये हातापायी देखील झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि महाआघाडीच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही रॅली क्रांती चौकातून सुरू होणार होत्या.
महाविकासआघाडीच्या वतीने प्रचारासाठी सकाळची वेळ घेण्यात आली होती. मात्र, कार्यकर्ते उशिरापर्यंत दाखल झाले नाहीत. तोपर्यंत महायुतीचे कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल झाले. त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यामुळे हा सदरील प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर काही वेळातच महायुती आणि महाआघाडीचे सर्व वरिष्ठ नेते देखील घटनास्थळी दाखल झाले. शहरात शांतता ठेवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री स्वतः उमेदवार आहेत. त्यामुळे वातावरण खराब झाले तर याला सर्वतोपरी ते जबाबदार असतील, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.