मुंबईत दिव्यांग महिलेला चोरट्यांनी धावत्या रेल्वेतून फेकले

maitrain loot

मुंबई, वृत्तसंस्था | एका दिव्यांग महिलेला चोरट्यांनी धावत्या एक्स्प्रेसमधून बाहेर फेकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. ही महिला गुजरात एक्स्प्रेसच्या अपंगांसाठीच्या डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी चोरट्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला फेकून दिले. या घटनेत तिला एक पाय गमवावा लागला असून, दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

 

नगमा अन्सारी असे या दिव्यांग महिलेचे नाव आहे. तिला दोन मुले आहेत. गुजरात एक्स्प्रेसच्या अपंगांच्या डब्यातून ती प्रवास करत होती. त्याचवेळी चोरट्यांनी तिच्याकडील किंमती वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने चोरट्यांचा प्रतिकार केला. चोरट्यांनी तिला धावत्या एक्स्प्रेसमधून फेकून दिले. यात तिला एक पाय गमवावा लागला, तर तिचा एक दुसरा पाय जायबंदी झाला आहे. नायर रुग्णालयात शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गुजरात एक्स्प्रेसमध्ये बसली. दादर स्थानक सोडल्यानंतर काही वेळाने एक व्यक्ती अपंगांच्या डब्यात आली. त्याने दरवाजा आणि खिडक्या बंद करण्यास सुरुवात केली. अन्सारीला ही गोष्ट विचित्र वाटली. तिने त्या व्यक्तीला विचारणा केली. त्यावेळी आम्ही प्लंबर असून कामासाठी डब्यात चढलो आहे, असे उत्तर दिले. एक्स्प्रेसने थोडा वेग घेतल्यानंतर त्याने तिच्याकडे किंमती वस्तूंची मागणी केली. तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेचे तोंड दाबून धरले आणि तिच्याकडील बॅग हिसकावली. तसेच बॅगमधील मोबाइल आणि रोकड काढून घेतली. तिने प्रतिकार केला असता, तिला मारहाणही केली तरी तिचा प्रतिकार सुरूच होता. त्यामुळे त्याने तिला ओढत दरवाज्याजवळ नेले आणि धावत्या एक्स्प्रेसमधून ढकलून दिले. रेल्वे रुळांजवळ पडलेल्या अन्सारीला एक पाय गमवावा लागला आहे, तर दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली आहे. तर हातालाही मार लागला आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करून घटनेची माहिती कळवली आहे.

याआधी वृद्ध महिलेवर केला होता हल्ला
अन्सारीने चोरट्याचे वर्णन केले असता, नोव्हेंबर महिन्यात अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरमध्ये घडलेल्या लुटीच्या घटनेतही तो आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. मानसी केळकर या ६२ वर्षीय वृद्धेकडील दागिने आणि फोन त्याने हिसकावला होता. तसेच वृद्धेला मारहाणही केली होती. आम्ही त्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण अन्सारीला दाखवले असता तिने आरोपीला ओळखले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content