धानोरा (प्रतिनिधी) गेल्या रविवारी (दि.२) दुपारी आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने चोपडा तालुक्यातील १४ गावातील शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यात प्राथमिक अंदाजात तब्बल ११०० हेक्टरवरील केळी व अन्य पिके नेस्तनाबूत झाली आहेत.
दरम्यान, अमळनेर विभागाचे प्रांताधिकारी, चोपडा तहसिलदार, नायब तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी प्राथमिक स्वरुपात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या वादळामुळे हाती आलेला घास अचानक निसर्गाने हिरावल्याने शेतकरी दोन दिवसांपासुन भुकेला असुन जेवणही त्याच्या घशाखाली उतरत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वादळातील नुकसानाबाबत गावनिहाय माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही. तसेच बिडगाव, मोहरद, वटार, सुटकार, चांदसणी, वडगाव या गावांची आकडेवारीही उपलब्ध नाही. दरम्यान, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन प्रत्यक्षात शेतक-यांशी हितगुज केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे, रा.कॉ. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे रज्जाक तडवी, अनिल महाजन, पन्नालाल पाटील, रतिलाल पाटील, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.